मारेकऱ्यांविषयी माझ्या मनात कोणतीही सहानुभूती नसणार – मंत्री पंकजा मुंडे

राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या परवानगीनंतरच भेटणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जेव्हा हे प्रकरण घडले, तेव्हा परिस्थिती चिघळल्याने देशमुख कुटुंबीयांनी त्यांना भेटायला येऊ नका अशी विनंती केली होती. त्यामुळेच पंकजा मुंडे यांनी त्यांना भेटायला गेले नव्हते.

राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे जाऊन श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले. माहूर गडावरील श्री रेणुका मातेची विधीवत पूजा करून आरती केली आणि अभिषेक करून देवीला साडी अर्पण केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधला.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, “सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण घडल्यानंतर मी देशमुख कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनीच मला विनंती केली की परिस्थिती चांगली नाही, तुम्ही येऊ नका. आता त्यांची परवानगी घेऊन जाईन असे मी आधीच जाहीर केले आहे. माझ्या जाण्यापेक्षा न्याय मिळणे महत्त्वाचे आहे. मी तिथे जाणे, संवेदना व्यक्त करणे हा माझा वैयक्तिक विषय आहे. त्याचे जगासमोर प्रगटीकरण करण्याची आवश्यकता नाही.”

देशमुख कुटुंबीयांनाही माहिती आहे की माझ्या मनात त्यांच्याविषयी सहानुभूती आहे. मारेकऱ्यांविषयी माझ्या मनात कोणतीही सहानुभूती नसणार, त्याबद्दल प्रश्नचिन्ह कशासाठी? असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

error: Content is protected !!