सादविका रमाकांत तिवारी (वय -30) राहणार मशीद बंदर आणि मोहसीन निजामउददीन खान (26) राहणार भेंडी बाजार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉटन एक्सचेंज नाका येथे ट्रॅफिक हवालदार आपले कर्तव्य बजावत असताना या सादविका या महिलेसोबत एक इसम होता. त्याने हेल्मेट घातलेले नव्हते. त्यामुळे या महिलेने वाद करुन वाहतूक हवालदार एकनाथ श्रीरंग पार्टे यांना मारहाण केली. त्यांची नेमणूक काळबादेवी ट्राफिक डिव्हिजन येथे करण्यात आली होती.
हे वाचा : १२ वर्षात पहिल्यांदाच IPL मध्ये घडला असा प्रकार
काळबादेवी परिसरात कॉटन एक्सचेंज नाका येथे महिलेची दादागिरी पाहायला मिळाली. या महिलेने एका वाहतूक पोलिसाला शिव्या दिल्याचा आरोप लावत मारहाण केली. चक्क महिलेने कॉलर पकडून कानशिलात लगावली. याप्रकरणी एल टी मार्ग पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत.
याप्रकरणी एल.टी.मार्ग पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती एल टी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम यांनी दिली. सादविका आणि खान यांना न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जाण्यात आले आहे.