काय म्हटलं आहे रश्मी पवारने फेसबुक पोस्टमध्ये?
राजकारणी आणि सेलिब्रिटी यांना करोनाची लागण झाली तर त्यांना लगेच आयसीयू बेड कसा मिळतो? असा बेड सामान्य माणसांना का मिळत नाही? असा प्रश्न विचारत नाशिकच्या एका तरुणीने तेथील आरोग्य व्यवस्थेबाबत आपली परखड मतं नोंदवली आहे. एक फेसबुक पोस्ट लिहून आणि एक व्हिडीओ पोस्ट करुन या तरुणीने काय घडलं ते मांडलं आहे. रश्मी पवार असं या तरुणीचं नाव आहे. या तरुणीचे वडील २५ दिवस करोनाशी लढा देत होते. मात्र त्यांचा जीव वाचू शकला नाही.
आमचा कोरोनाचा अनुभव…!!
ह्याला ‘अनुभव’ म्हणावं की नाही ह्याबद्दल मी साशंक आहे,कारण एका मुलीसाठी तिचा बाबा हे जग कायमचा सोडून जाणं ह्यापेक्षा कठीण अजून काय असू शकतं आयुष्यात..
माझ्यासारखे कित्येक जण आहेत आज बाहेर जे त्यांच्या वडिलांसाठी वणवण फिरताय..केवळ १ ICU बेड मिळावा म्हणून…बाहेर प्रचंड कठीण परिस्थिती आहे कोरोना रुग्णांची.. कुठे hospitals ची दयनीय अवस्था,Ventilators चा तुटवडा,कुठे जागा असून सुद्धा रूग्णांना भरती करून देण्यास नकार,कुठे hospitals चे भरमसाठ आणि न परवडू शकणारे खर्च आणि अजून बरंच..
रूग्णाच्या मृत्यूनंतरही शरिराचे हाल होताहेत..
नाशिकच्या अमरधाममध्ये विद्युत दाहीनीसाठी सुध्दा ‘वेटींग’ आहे १०-१० तासांचं..
असं सगळं होत असून सुध्दा प्रशासन जागं का होत नाहीये हा मोठा प्रश्न आहे.
जेव्हा नाशिकमध्ये फक्त १२ रूग्ण होते तेव्हा lockdown होतं आणि आता जेव्हा दिवसाला १००० च्या पटीत रूग्ण संख्या वाढतेय तेव्हा सताड सगळं सुरू केलंय आणि लोकंही पिसाळल्यासारखी वागताय…
जोपर्यंत कोरोना आपल्या घरात येत नाही,तोपर्यंत त्याचं गांभीर्य आपल्याला समजणार नाही…
तो घरात येण्याची वाट बघू नका…
वेळीच सावध व्हा…
किमान आतातरी प्रशासनाला जाग यावी
आणि
जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावे हिच अपेक्षा…
-रश्मी पवार (नाशिक)
नाशिकच्या अमरधाम या स्मशानभूमीत विद्युत दाहिीनीसाठीही वेटिंग असल्याचं रश्मीने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. इतकंच नाही तर जेव्हा अमरावतीच्या खासदार आजारी होतात तेव्हा त्यांना मुंबईत आयसीयू बेड कसा मिळतो? सेलिब्रिटींना आयसीयू बेड कसे काय मिळतात? मग तेच सामान्यांना का मिळत नाहीत असाही प्रश्न या तरुणीने विचारला आहे. रश्मी पवारच्या वडिलांचं करोनामुळे निधन झालं. त्यानंतर तिने पोस्ट केलेला व्हिडीओ आणि त्यासोबत असलेला संदेश हा सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. ऑक्सिजन बेड मिळवण्यासाठी काय दिव्य करावं लागतं? नाशिकमध्ये कशी रुग्णालयांची कशी मनमानी चालते? ऑक्सिजन बेड उपलब्ध होईल असं सांगून शेवटच्या क्षणी कसा नकार दिला जातो अशी सगळी परिस्थिती रश्मी पवारने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये आणि व्हिडीओमध्ये मांडली आहे.