मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षाचे प्रमुख नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पक्षाच्या प्रचाराची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
माजी मंत्री धनंजय मुंडे हे पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतील एक प्रमुख चेहरा आहेत. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वशैली आणि जनमानसातील पकडीमुळे ते राज्यभरात पक्षाची भूमिका आणि धोरणे जनतेपर्यंत पोहोचवतील. अजित पवार यांनी मुंडे यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवून आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केल्याचे संकेत दिले आहेत.
स्टार प्रचारकांच्या यादीत दिग्गज नेत्यांचा समावेश
धनंजय मुंडे यांच्यासह अजित पवार यांनी पक्षातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांना स्टार प्रचारकाची जबाबदारी दिली आहे. यामध्ये अमोल मिटकरी, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, लातूर येथील मारहाण प्रकरणानंतर चर्चेत आलेले सूरज चव्हाण यांचा समावेश आहे. याशिवाय, सर्व मंत्र्यांसह अभिनेते सयाजी शिंदे, माजी खासदार समीर भुजबळ आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावरही ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
धनंजय मुंडे यांच्यासारख्या अनुभवी आणि लोकप्रिय नेत्याला स्टार प्रचारक म्हणून मैदानात उतरवण्याचा निर्णय पक्षासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे मंत्रीपद सोडण्याची वेळ आलेल्या धनंजय मुंडे यांनाही अजित पवार यांनी स्टार प्रचारकपदाची जबाबदारी करुन अंशत: त्यांचे पुनर्वसन केले आहे. मंत्रीपद सोडल्यानंतर धनंजय मुंडे हे पक्षात त्यांच्याकडे कोणतीही जबाबदारी नसल्यामुळे फारसे सक्रिय नव्हते. मध्यंतरी एका कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना, ‘माझ्यावर कोणतीही जबाबदारी द्या’, अशी विनंती केली होती. अखेर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांना स्टार प्रचारक म्हणून संधी दिली आहे.