बीड,दि.6 (प्रतिनिधी):
बीड शहराजवळील कामखेडा येथे प्रस्तावित विमानतळासाठी कामखेडा गावात जागा निश्चित करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने आज एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी बीड शहराजवळील कामखेडा येथील प्रस्तावित विमानतळ परिसरास प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. या पाहणी दरम्यान प्रस्तावित जागेचे सर्व तांत्रिक व प्रशासकीय पैलू तपासण्यात आले. विमानतळ प्रकल्पासाठी बीडजवळील कामखेडा परिसर अधिक सोयीचा ठरेल, असा निष्कर्ष प्राथमिक चर्चेतून पुढे आला आहे. याठिकाणी राज्य सरकारची दोनशे एकरांपेक्षा अधिक जमीन उपलब्ध असून, जमिनीचा उतार आणि भौगोलिक परिस्थिती विमानतळ उभारणीस पोषक असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.या संदर्भात प्रशासनासोबत बैठक घेऊन एकत्रितपणे समन्वयाने याला गती दिली जाईल असे स्पष्ट केले आहे.
या प्रसंगी भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापक प्रशांत गुप्ता, महाव्यवस्थापक रोशन दासू कांबळे, उपमहाव्यवस्थापक अनुराग मिश्रा, पि.के. मोरया, सहाय्यक महाव्यवस्थापक अशवाणी कुमार आणि अंजनी कुमारी, महाराष्ट्र विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता राजकुमारी बॅरी, उपविभागीय अधिकारी कविता जाधव, तहसीलदार चंद्रकांत शेळके, जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र चिंचाणे, जिल्हा अधीक्षक भूमिलेख कृष्णा शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी बीड अमोल सांगुळे आणि वन परिमंडळ अधिकारी बीड देविदास गाडेकर उपस्थित होते.
या पाहणी दरम्यान एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाने विमानतळासाठी निवडलेल्या जागेची सविस्तर पाहणी केली. यानंतर या समितीने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेवून विमानतळ प्रकल्प उभारणीसाठी आवश्यक सुविधांची तपासणी करुन नियोजनावर सविस्तर चर्चा केली.
विमानतळासाठी एकूण 170 हेक्टर जागा लागणार असुन, यापैकी 80 हेक्टर जागा शासनाकडे उपलब्ध असुन इतर जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे. विमानतळ प्रकल्पासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, जमीन मोजमाप, वन विभागाशी संबंधित सर्व परवानग्या, पाणी पुरवठा आणि रस्ते संपर्क यासह विविध तांत्रिक बाबींची सविस्तर माहिती घेवून चर्चा केली. विमानतळ उभारणीसाठी जिल्हा प्रशासन आणि विमानतळ प्राधिकरण यांच्यात समन्वयाने नियोजन पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कामखेडा ठिकाण अधिक व्यवहार्य असून, कामखेडा हे ठिकाण सोलापूर–नाशिक राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आहे. तसेच येथील रस्ते संपर्कही उत्तम आहे. याठिकाणाच्या भौगोलिक रचनेमुळे भूसंपादनाचा खर्च तुलनेने कमी येणार आहे. या पाहणीदरम्यान विमानतळ प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वयाने प्रकल्पाचे नियोजन जलद गतीने पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले की, “विमानतळ प्रकल्पामुळे बीड जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल, तसेच गुंतवणुकीच्या संधींनाही चालना मिळणार आहे. यासाठी सर्व विभागांनी एकत्रित प्रयत्न सुरू केले आहेत.”
या विमानतळ प्रकल्पामुळे बीड जिल्ह्यातील परिसराचा विकास आणि दळणवळणाच्या सुविधेत वाढ होणार आहे. तसेच व्यापार, पर्यटन आणि औद्योगिक विकासाला देखील देखील गती प्राप्त होवून रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होणार आहे.
यावेळी मंडळ अधिकारी पेंडगाव अंगद काशीद, ग्राम महसूल अधिकारी कामखेडा गणेश गायकवाड, भूमापक संजय जायभाये, कामखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंच मीना बेगम अमीर शेख आदींची उपस्थिती होती.
*****