बीड, दि. ८ (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन; विविध मागण्यांसाठी एल्गार
बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आज, शुक्रवार (दि. ८) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. पगारातील अनियमितता आणि इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केले असून, राज्य सरकारने तातडीने मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनातील अनियमिततेमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पगार न मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्यांचा पगार नियमित करावा, अशी प्रमुख मागणी या आंदोलनातून करण्यात आली.
कॉ. नामदेव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. वेळेवर पगार मिळावा, वेतनवाढ लागू करावी, तसेच इतर प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. राज्य सरकारने याकडे तातडीने लक्ष देऊन कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करावे, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.