बीड दि.14 (प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्य विकास सेवा गट अ संवर्गातील उपायुक्त आस्थापना व उपायुक्त विकास यांच्या पदनामांमध्ये बदल करणे बाबत महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेच्या वतीने शासनाकडे वारंवार विनंती केली होती. सदर मागणी ही संघटनेच्या वतीने अनेक वर्षापासून करण्यात येत होती. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्याकडे वारंवार बैठका देखील संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या होत्या. अखेर ग्रामविकास व पंचायत राजमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या मान्यतेने ग्रामविकास विभागाचे उप आयुक्त हे अप्पर आयुक्त झाले.
त्या अनुषंगाने दि. 13 मे 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार शासनाने महाराष्ट्र विकास सेवा गट-अ संवर्गातील उप आयुक्त (आस्थापना) व उप आयुक्त (विकास) यांच्या पदनामांमध्ये अप्पर आयुक्त (आस्थापना) व अप्पर आयुक्त (विकास) असा बदल केलेला आहे. पदनामातील बदलामुळे महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेतील अधिकारी यांचे कडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. राज्याच्या ग्रामविकास कार्यात अधिक गतीमानता आणण्याचा तसेच शासनाच्या योजनेचा लाभ तळागाळातील नागरीकापर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी अधिक सक्षमपणे काम करतील.
सदर निर्णयासाठी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री ना.अजित पवार, ग्राम विकास व पंचायत राज मंत्री ना. जयकुमार गोरे, राज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्यासह प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी संघटनेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण केली आहे. महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेच्या वतीने या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
सदर निर्णय व्हावा यासाठी महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित संघटनेचे अध्यक्ष सुरेश बेदमुथा सरचिटणीस वासुदेव सोळंके यांच्यासह सर्व संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.