शेवगाव तालुक्यातील आडगाव येथे ५ ते १२ मे दरम्यान श्रंगऋषीगडाच्या पहिल्या नारळी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी यजमानपद स्वीकारून, हा सप्ताह भक्तीमय वातावरणात साजरा करण्याची जय्यत तयारी केली आहे.
सप्ताहाचे उद्घाटन श्री क्षेत्र श्रंगऋषीगडाचे मठाधिपती महंत सुरेशानंद महाराज यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये दररोज श्रीमद भागवत कथा, विविध संतांच्या कीर्तन प्रवचन, तसेच भक्तांसाठी पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तांना या सप्ताहात अध्यात्मिक प्रेरणा मिळणार असून विविध गावांमधील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
विशेषतः महंत सुरेशानंद महाराज यांनी फिरता नारळी सप्ताह सुरू करण्याचा संकल्प जाहीर केला असून, ही परंपरा यापुढे दरवर्षी श्रंगऋषीगडावर साजरी केली जाणार आहे. सप्ताहाच्या आठव्या दिवशी भक्तीमय वातावरणात हरिकीर्तन होणार असून, त्यानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता केली जाईल. ग्रामस्थ उत्साहाने तयारी करत असून, हा महोत्सव सर्वांसाठी भक्ती आणि अध्यात्माचा आनंद घेण्याची उत्तम संधी ठरणार आहे.