पुण्यात गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार: निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला टोळक्याची मारहाण
पुणे, राज्याची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी, सध्या गुन्हेगारीच्या घटनांनी हादरून गेले आहे. ड्रग्ज प्रकरण, कोयता गँग, स्थानिक गुंडांच्या टोळ्या आणि अत्याचाराच्या घटनांनी शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या पार्श्वभूमीवर, भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर काही युवकांनी पोलिसांच्या गाड्यांवर चढून केलेल्या धिंगाण्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. आता या साखळीतील आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यात निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला घरात घुसून टोळक्याने मारहाण केली आहे.
पुण्यातील चंदन नगर भागातील फॉरेस्ट पार्कमध्ये ही घटना घडली असून, याप्रकरणी विमानतळ नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरखनाथ एकनाथ शिर्के असे मारहाण झालेल्या निवृत्त पोलीस उपनिरीक्षकांचे नाव असून, किरकोळ वादाच्या कारणावरून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली.
झाकण तोडल्याच्या संशयावरून हल्ला
घरासमोरील चेंबरचे झाकण तोडल्याच्या संशयावरून आठ ते दहा जणांच्या टोळक्याने शिर्के यांच्या घरात घुसून धुडगूस घातला. राजू शंकर देवकर आणि गोविंद कॅनल या प्रमुख आरोपींसह येरवडा परिसरातील काही गुंड प्रवृत्तीच्या टोळक्यांनी ही हल्ला केला, असे सांगण्यात येत आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
गुन्हा दाखल, पण अटक नाही
निवृत्त पोलीस उपनिरीक्षक गोरखनाथ शिर्के यांच्या फिर्यादीवरून 10 ते 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही, हे विशेष लक्षवेधी ठरत आहे. पोलीस अधिक तपास करत असले तरी हल्लेखोरांना अटक न झाल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
राजू देवकर आणि गोविंद कॅनल यांच्यासह टोळक्याच्या या गुंडगिरीमुळे निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस खात्यातील शिर्के यांचे माजी सहकारी या घटनेमुळे प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही शंका उपस्थित केली जात आहे.