भाजपचे पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याच्या अनेक वादग्रस्त कृत्यांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिरुर कासार येथे एका व्यक्तीस बॅटने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खोक्याच्या आणखी गंभीर कृत्यांची उकल झाली आहे. परिसरातील वन्यजीवांची शिकार करून त्यांचे मास खाण्याचे प्रकारही त्याने केल्याचे उघडकीस आले आहे.
शिरुर गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना खोक्याने मारहाण केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर खोक्या भोसले व त्याच्या टोळीने शेकडो वन्यजीव, हरिणे, काळवीट, ससे आणि मोरांची शिकार केल्याचा आरोप वन्यजीवप्रेमींनी केला आहे. विशेषतः हरणांच्या शिकारीचे अवशेष आढळून आल्याचा दावाही केला जात आहे. त्यामुळे वन विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, संबंधित ठिकाणी तपास सुरू केला आहे.
बावी गावातील डोंगर परिसरात हरणांचा मोठा कळप होता. पाणी व चाऱ्यासाठी येथे येणाऱ्या हरणांची खोक्या भोसले आणि त्याच्या टोळीकडून जाळी लावून शिकार केली जात होती. या जाळीबाबत हरकत घेतलेल्या व्यक्तींनाही धमकावून मारहाण केल्याचे वृत्त समोर आले आहे. परिणामी, वन विभागाने घटनास्थळी भेट देत या भागाची तपशीलवार पाहणी केली. अधिकाऱ्यांनी पंचनामा करून घटनास्थळी सापडलेली हरणांची कवटी व हाडे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश दिले आहेत.
वन अधिकारी ए.एम. देवगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेचा सर्वंकष तपास सुरू आहे. वन्यजीव शिकारीचे गंभीर आरोप पाहता, दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
ही घटना वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने गंभीर असल्याचे मानले जात असून, या प्रकरणावर समाजातील विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वन विभागाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.