पंकजा मुंडे नुकत्याच धनंजय मुंडे यांच्या निवासस्थान, सातपुडा बंगल्यावर पोहोचल्या. रात्री ९ वाजता त्या आपल्या कारने बंगल्यावर आल्या. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची ही पहिलीच भेट असल्याने या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे आजारी आहेत. त्यांच्या डोळ्याची नुकतीच शस्त्रक्रिया पार पडली असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर, त्यांना बेल्स पाल्सी नावाचा दुर्मिळ आजार झाला आहे. या आजारामुळे त्यांना सलग दोन मिनिटेही व्यवस्थित बोलता येत नव्हते. रिलायन्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांनी स्वतः ट्वीट करून याबद्दल माहिती दिली होती.
या पार्श्वभूमीवर, पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांची प्रकृती बरी नसल्याने ही भेट घेतल्याचे बोलले जात आहे.