बीड, प्रतिनिधी: बीड जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन केले आहे की, कोणीही मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करून वैध अथवा अवैध शस्त्रांचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रदर्शित करू नयेत. तसेच, मारामारीच्या घटनेतील रेकॉर्ड केलेले फोटो किंवा व्हिडीओ, शिव्या देतानाचे व्हिडीओ अथवा समाजात दहशत किंवा भीती निर्माण होईल अशी कोणतीही पोस्ट कोणत्याही सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर किंवा फॉरवर्ड करू नयेत.
ज्यांनी यापूर्वी अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर प्रदर्शित केल्या असतील, त्यांनी त्या तात्काळ डिलिट कराव्यात. समाज माध्यमांवर शस्त्रांचे, मारामारीचे किंवा शिवीगाळ केल्याचे फोटो किंवा व्हिडीओ प्रदर्शित केल्यास, त्यावर लाईक केल्यास किंवा फॉरवर्ड केल्यास, तसेच अशा पोस्ट आम्ही दिलेल्या सूचनेनंतरही डिलिट न केल्यास, अशा व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान अधिनियम तसेच इतर कायद्यांनुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिला आहे.