काँग्रेसमध्ये ज्यांचं कोणी नाही त्यांच्यासोबत मी आहे – ऊर्जा मंत्री नितीन राऊत

औरंगाबाद | काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका. काँग्रेसमध्ये ज्यांचं कोणी नाही त्यांच्यासोबत मी आहे, अशी ग्वाही ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिली आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

काँग्रेसची विचारधारा ही राज्यघटनेची विचारधारा आहे. काँग्रेस केवळ एक पक्ष नसून एक विचार आहे. समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचे विचार हे काँग्रेसच्या राजकीय विचारधारेचा भाग आहे. तसेच काँग्रेसमध्ये ज्यांचे कोणी नाही त्यांच्यासोबत मी आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी आहेत आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आहेत, असं नितीन राऊत म्हणाले.

औरंगाबाद महानगरपालिका निवडणूकीत जी काही मदत लागेल ती काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष यांनी सांगावी. मी मदत नक्की करेल, असा शब्दही नितीन राऊत यांनी यावेळी बोलताना दिला आहे.

दरम्यान, एखादा अधिकारी नागरिकांसोबत मग्रूरपणे वागत असेल तर त्यांची मग्रुरी खपवून घेतली जाणार नाही, असा दम ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यांनी ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. सर्व ग्राहकांना विनातक्रार वीज वितरण सेवा देताना कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्भवणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्या तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने अधिक यंत्रणांनी तयार राहावं, असे आदेश नितीन राऊत यांनी यावेळी दिले.

error: Content is protected !!