74 वर्षीय रणधीर यांना कोरोनाचा संसर्ग
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 74 वर्षीय रणधीर यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीविषयीची फारशी माहिती समोर आलेली नाही. दिवंगत राजीव कपूर यांच्या मालमत्तेच्या वादावरून कपूर कुटुंब सध्या चर्चेत आहे.
शोमॅन म्हणून ओळखल्या जाणार्या राज कपूर यांच्या पाच मुलांपैकी तीन मुलांचे गेल्या 16 महिन्यांत निधन झाले आहे. राज कपूर यांना रणधीर, ऋषी आणि राजीव ही तीन मुले आणि रितू आणि रिमा या दोन मुली होत्या. आता तीन भावांपैकी रणधीर कपूर आणि बहिणींमध्ये रिमा जैन हयात आहेत. ऋषी कपूर यांचे 30 एप्रिल 2020 रोजी कॅन्सरमुळे निधन झाले. ऋषी कपूर दोन वर्षे कर्करोगाशी लढा देत होते. मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली होती. तर सर्वात धाकटे भाऊ राजीव यांचे यावर्षी 9 फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बहीण रितू नंदा यांचे 14 जानेवारी 2020 रोजी दिल्लीत निधन झाले होते. त्यांना कॅन्सर झाला होता.