मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सात जणांना पद्मविभूषण, 10 जणांना पद्मभूषण, तर 102 जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाले आहेत. यामध्ये ठाकरे सरकारने राज्यातून पाठवलेल्या यादीतल्या नावांमधील फक्त सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्रीचा मान मिळाला.राज्यातील ठाकरे सरकारने पद्म पुरस्कारांसाठी केंद्राकडे 98 मान्यवरांच्या नावांची शिफारस केली होती. यामध्ये शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या नावाचाही समावेश होता.
संजय राऊत यांनाही पद्म पुरस्कारने सन्मानित करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली होती. त्यासोबतच उद्योगपती मुकेश अंबानी, लिटिल मास्टर सुनील गावसकर, एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख यांचं नाव पद्मविभूषणसाठी पाठवलं होतं.
दरम्यान, ‘सिरम’चे अदर पूनावाला, प्रोफेशनल स्कायडायव्हर शीतल महाजन, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेते मोहन आगाशे, कै. राजारामबापू पाटील व डॉ. मिलिंद कीर्तने यांची नावे पद्मभूषणसाठी तर पद्मश्रीसाठी खा. संजय राऊत, यशवंतराव गडाख, डॉ. जगन्नाथ दीक्षित, मधुकर भावे यांच्यासह 88 नावांची शिफारस राज्याकडून केली गेली होती.
यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. ‘पद्म पुरस्कारासाठी राज्य सरकारने केंद्राला सुचवलेल्या ९८ नावांपैकी पद्मविभूषणसाठी ज्यांच्या नावाने रोज थयथयाट केला जातो ते उद्योगपती मुकेश अंबानी आणि पद्मश्रीसाठी ब्रम्हांडभूषण सर्वज्ञानसंपन्न संपादक संजय राऊत यांचीही नावे होती… मात्र केंद्राने एकच नाव स्वीकारलं सिंधुताई सपकाळ.’ असे म्हणत भातखळकर यांनी शेतकरी आंदोलनाच्या अनुषंगाने उद्योजकांवर टीका करणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांना डिवचले आहे.