महाराष्ट्रासह मराठवाडय़ात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीपोटी केंद्र सरकारने किती मदत करावी, याचा अंदाज घेण्यासाठी केंद्रीय पथकाने सोमवारी औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना जिल्ह्यातील पीक नुकसानीचा आढावा शेतकऱ्यांशी संवाद साधून घेतला.
मराठवाडय़ात ५४ लाख हेक्टर पिकांचं नुकसान झाल्याने ३६ शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. जून ते ऑक्टोबर कालावधीतील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मदत म्हणून राज्य सरकारने दिलेल्या मदतीपैकी पहिल्या टप्प्यातील १३१२ कोटी रुपयांच्या निधीचे वितरणही करण्यात आले आहे. मात्र, या काळात विमा कंपन्यांनी कसे काम केले, गरज काय आहे, कोणती पिकेलावली जातात, तीच पिके का घेतली जातात, असे प्रश्न विचारुन पथकाने ऑक्टोबपर्यंतच्या अतिवृष्टीचा आढावा घेतला. येत्या दोन आठवडय़ात किती मदत करता येईल किंवा किती नुकसान झाले होते, याचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाईल असे पथकातील अर्थ विभागातील सदस्य आर.बी. कौल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मराठवाडय़ातील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या पथकासमोर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पिकांचे नुकसान तसेच मनुष्यबळ आणि पशुधनाची हानी यांची माहिती सादर केली होती.