वृत्तपत्र हाताळण्यातून करोनाचा फैलाव होतो ‘चला हवा येऊ द्या’विरोधात संतापाची लाट उसळली.

वृत्तपत्रांबाबत गैरसमज निर्माण करणारा, ‘चला हवा येऊ द्या’चा हा भाग मंगळवार, ४ ऑगस्ट रोजी ‘झी मराठी’ वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला होता. ओढूनताणून विनोदनिर्मिती करण्याच्या नादात आपण वैद्यकीय वास्तवाचा विपर्यास करतो आहोत याचे भान यात राखण्यात आले नव्हते.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जूनमध्ये वर्तमानपत्रांच्या वितरणाबाबत आपले मत नोंदविताना स्पष्ट केले होते की, ‘वर्तमानपत्राच्या माध्यमातून करोनाचा फैलाव होऊ शकतो, असा कोणताही ठोस पुरावा किंवा आरोग्यतज्ज्ञांचे मत नाही. उलट वर्तमानपत्रे कोणताही अतिरेक न करता करोनाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करत आहेत.’ जागतिक आरोग्य संघटनेनेही वृत्तपत्र हे पूर्णत: सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला आहे. असे असतानाही, वर्तमानपत्रांविषयी चुकीची माहिती, तसेच वृत्तपत्र वितरणाचे काम करणाऱ्या मुलांविषयी गैरसमज पसरविणारी माहिती देण्याच्या या प्रकारावर टीकेची झोड उठत आहे. या कार्यक्रमाचे लेखक-दिग्दर्शक निलेश साबळे हे स्वतः डॉक्टर आहेत हे विशेष.

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या मंगळवारच्या भागात वृत्तपत्रांसंदर्भात केलेले वक्तव्य ही अनवधानाने झालेली चूक आहे. हेतूपुरस्सर केलेली ही कृती नाही. कोणतीही संस्था, समूहाचा किंबहुना वृत्तपत्र वितरकांच्या भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही. या चुकीबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत.

– निलेश मयेकर, बिझनेस हेड (झी मराठी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!