सम आणि विषम तिथीच्या सूत्रातून अपेक्षित संततीप्राप्तीचा मंत्र सांगून अडचणीत सापडलेल्या समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांना संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.
समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी पुणे जिल्ह्यातील उरण व नगर तालुक्यातील एका ठिकाणी आपल्या कीर्तनातून सम आणि विषम तिथीचे सूत्र मांडतांना त्यातून अपेक्षित संततीची प्राप्ती होते असे वादग्रस्त विधान केल्याचा आरोप करीत अंधश्रद्ध निर्मुलन समितीने जिल्हा शल्यचिकित्सकांकडे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.भास्कर भंवर यांनी संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांच्या न्यायालयात इंदोरीकरांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती, न्यायालयाने इंदोरीकरांना म्हणणे सादर करण्यासाठी पुरेसा वेळ देत जवळपास महिन्याभरानंतर आजची तारीख दिली होती
मात्र त्या दरम्यान प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांच्या निर्णयाला इंदोरीकरांनी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिले. वरिष्ठ न्यायालयाने त्यांना 20 ऑगस्ट रोजी सुनावणीची तारीख देत खालच्या न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. आज सकाळी न्यायालयीन कामकाज सुरु होताच इंदोरीकरांचे वकील के.डी.धुमाळ यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांसमोर हजर होत त्यांना जिल्हा न्यायालयाच्या आदेशाची व स्थगितीची माहिती दिली.