मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भेटीवरून बराच किस पाडला जात असताना आज महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार (Sharad Pawar) हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thakre) यांच्या भेटीसाठी थेट वर्षा निवासस्थानी पोहचले आहेत. राऊत-फडणवीस भेटीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. महाराष्टाच्या (Maharashtra) राजकारणात (Politics) लागोपाठ महाभेटी घडताना दिसत आहेत. हा निव्वळ योगायोग आहे की पडद्यामागे काहीतरी शिजत आहे, हा प्रश्न तूर्त अनुत्तरितच आहे.
हे वाचा : रात्री गुपचूप पुरवायचा सेलिब्रिटींना ड्रग्स… पहा काय आहे प्रकार
( NCP Chief) शरद पवार हे विविध मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यासाठी सातत्याने मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेत असतात. महाविकास आघाडीचे मार्गदर्शक या नात्याने पवार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असतात. करोनाची साथ, निसर्ग चक्रीवादळाचं संकट, मराठा आरक्षणाबाबत निर्माण झालेला पेच या मुद्द्यांवर पवार यांनी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र, शरद पवारांची आजची वर्षाभेट या सगळ्या भेटींपेक्षा लक्षवेधी ठरली आहे. महाविकास आघाडीच्या स्थापनेतील एक प्रमुख नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची कालच भेट घेतली असताना पवार तातडीने आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याने या भेटीचं महत्त्व वाढलं आहे.
राऊत व फडणवीस यांच्यात शनिवारी ग्रँड हयातमध्ये ‘लंच पे चर्चा’ झाली. तब्बल दोन तास हे दोन्ही नेते एकत्र होते. ही भेट आधी गुप्त राखण्यात आली आणि नंतर त्याच्या बातम्या फुटताच दोन्ही बाजूकडून त्यावर स्पष्टीकरण देण्यात आलं. ‘सामना’साठी राऊत मुलाखत घेत आहेत. त्याअनुषंगाने आमची भेट झाली, असे फडणवीस यांनी सांगितले तर राऊत यांनीही तोच सूर लावला. शिवेसेनेत गुप्त बैठका वगैरे होत नाहीत. मुलाखतीबाबत ही भेट होती. त्याचे वेगळे अर्थ काढण्याचे कारण नाही. राजकारणात आम्ही वैयक्तिक शत्रुत्व मानत नाही, असे नमूद करत आमच्या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती, असा दावा राऊत यांनी केला.
राऊत आणि फडणवीस यांच्या भेटीवर दोन्ही बाजूकडून ‘तसं काहीच नाही’ असं सांगितलं जात असलं तरी महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) मात्र या भेटीने अस्वस्थता वाढली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे (Rashtrawadi Congress) काही नेते खासगीत या भेटीवर आक्षेप नोंदवत आहेत. त्यामुळेच हे मळभ दूर करण्यासाठी शरद पवार मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहचल्याचे काही जाणकारांचे म्हणणे आहे. पवार यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरातही या बैठकीला उपस्थित होते. सुमारे पाऊण तास या तिघांमध्ये चर्चा झाली.