मुंबई- दीपिका पादुकोणला ड्रग्ज लिंकच्या संशयावरून नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावला. यानंतर आज दीपिकाही सकाळी ११ वाजता ठरलेल्या वेळेत एनसीबीच्या गेस्टहाऊसला चौकशीसाठी गेली. सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूच्या तपासादरम्यान बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आले. यानंतर अनेक बड्या सेलिब्रिटींची नावं समोर आली. आज दीपिकाची जवळपास ५.३० तासांहून अधिकवेळ चौकशी करण्यात आली. या दरम्यान अनेकांच्या मनात एक प्रश्न आहे तो म्हणजे या प्रकरणात दीपिकाला अटक होईल का? ईटाइम्सने याबाबत काही मोठ्या कायदेशीर तज्ज्ञांशी चर्चा केली.
कायदेशीर बाबींमध्ये व्हॉट्सअप चॅटची किंमत अगदीच नगण्य- मजीद मेमन
ज्येष्ठ कायदेशीर तज्ज्ञ मजीद मेमन यांच्या मते, नारकोटिक्स अँड सायकोट्रॉपिक अॅक्ट (NDPS) हा एक कडक कायदा आहे. एनसीबीकडे चौकशीचे अनेक अधिकार आहेत. दीपिकाच्या प्रकरणाचा जो मुद्दा आहे, त्यात दीपिकाची साक्षीदार म्हणून किंवा आरोपी म्हणून चौकशी केली जाऊ शकते. या प्रकरणात व्हॉट्सअॅप चॅटची किंमत नगण्य आहे. हे जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे की तिने इतरांना ड्रग्ज घेण्यास प्रवृत्त केलं की ती स्वतःच ड्रग्ज घ्यायची. बरेच लोक स्वतःसाठी ड्रग्ज घेतात. अशा परिस्थितीत, ही एक छोटीशी गोष्ट होऊन जाते.
एनडीपीएस कायद्यांतर्गत दीपिकावर गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाहीः रिझवान मर्चंट
कायदेतज्ज्ञ रिझवान मर्चंट यांनी बॉलिवूडमधील अनेस सेलिब्रिटींची प्रकरणं हाताळली आहेत. ते म्हणाले की, रिया आणि दीपिकाचं प्रकरणं पूर्णपणे वेगळं आहे. रियावर मादक पदार्थांचं सेवन आणि त्याचे पैसे देण्याचा आरोप आहे. दीपिकावर असा कोणताही आरोप नाही. दीपिका आणि करिश्मा यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट हा पुरावा म्हणून जरी घेतला तरी त्याहून गुन्हा सिद्ध होत नाही.
आताच दीपिकाच्या अटकेचा विचार करणं अतिशयोक्ती होईल- हितेश जैन
दुसरे कायदेशीर तज्ज्ञ हितेश जैन म्हणतात की, आता चुकीचं काम केल्याचे पुरावे सापडले आहेत. या सर्व गोष्टींचा अजून शोध घेणं बाकी आहे. यासाठीच त्यांना चौकशीचा समन्स बजावण्यात आला. याक्षणी, मी एवढेच सांगू शकतो की त्यांच्या व्हॉट्सअॅप चॅटशिवाय इतर लोकांनी जे तिच्याविरोधात जबाब दिले आहेत त्यावर प्रश्न उपस्थित केले जातील. दीपिकाच्या अटकेबाबत आत्ताच विचार करणं खूप घाई होईल. जरी तसं झालं तरी ते एनडीपीएसच्या कलम २० अंतर्गत असेल आणि आता आपल्याला माहीत नाहिये की तिच्या विरोधात नक्की काय पुरावे मिळाले आहेत.