Corona: हे इंजेक्शन देण्यापूर्वी कुटुंबीयांची संमती बंधनकारक

या इंजेक्शनचा करोना संसर्गाच्या उपचारपद्धतीमध्ये वापर करताना तो मध्यम स्वरूपाची (मॉडरेट) लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी करावा, असे महत्त्वाचे निर्देश वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने दिले आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यापूर्वी रुग्णाच्या कुटुंबीयांची संमतीही घेणे बंधनकारक आहे. त्यांना यासंदर्भात माहिती नसताना हे इंजेक्शन देण्यात येऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
रेमडेसिवीरचा वापर पूर्णपणे प्रभावी असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही, मात्र उपचाराच्या प्रायोगिक पद्धतीनुसार हे इंजेक्शन देण्यात येत आहे. केंद्रीय औषध नियामक मंडळ आणि टास्क फोर्सने दिलेल्या निर्देशानुसार करोनारुग्णांच्या उपचारपद्धतीमध्ये या इंजेक्शनचा वापर केला जात आहे. काही रुग्णालयांमध्ये या इंजेक्शनचा वापर सौम्य लक्षणे असतानाही खबरदारीचा उपाय म्हणून केला जातो. त्यासाठी रुग्णाच्या कुटुंबीयांची धावाधावही होते. मात्र ज्यांना मध्यम प्रकारची लक्षणे आहेत त्यांच्यासाठी हे इंजेक्शन वापरणे गरजेचे आहे.
स्टिरॉइडचा वापर हा ऑक्सिजनची गरज नसलेल्या रुग्णांमध्ये करू नये. त्याचे प्रतिकूल परिणाम रुग्णांच्या प्रकृतीवर दिसतात. परदेशामध्ये करोना संसर्ग झाल्यानंतर ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे, अशा रुग्णांमध्ये स्टिरॉइडचा वापर लाभदायक दिसून आला आहे.
रुग्णहिताच्या दृष्टीने नियमावली गरजेची
या नियमावलीनुसार, रुग्णाला संसर्ग झालेल्या पहिल्या दहा दिवसांमध्ये पाच दिवसांसाठी इंजेक्शनचा डोस देण्यात यावा. दहा दिवसांसाठी हा डोस देण्याची गरज नाही. यासंदर्भात संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ही नियमावली रुग्णहिताच्या दृष्टीने गरजेची असल्याचे सांगितले. रुग्णांना हे इंजेक्शन देताना रुग्णाच्या नातेवाईकांची संमती घ्यावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. हे इंजेक्शन दिल्यानंतर काही रुग्णांमध्ये उलट्या होणे, हातपाय थरथरणे, जुलाब, चक्कर येण्यासारखे त्रासही दिसून आले आहेत. त्यामुळे या लक्षणांचा विचार करणेही महत्त्वाचे ठरते.

error: Content is protected !!