बीड जिल्ह्यात शिक्षण, बहुजन चळवळीतील मोलाचे योगदान देणारे बहुजन विचारांचे छत्र आज काळाच्या पडद्याआड गेले आहे. बहुजनांसाठी हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र असे बदल करत विविध पॅटर्न प्राचार्य पी. बी सावंत सरांनी यशस्वी केले होते. सावंत सर म्हणजे चालते बोलते विद्यापीठ होते. बीड मध्ये पहीले सकल मराठा महासंमेलन हि सरांची देण होती. यातील विचारांची गुंफण बीडकरांसाठी पर्वणीच ठरली होती. नियतीने एखाद्या व्यक्तीस किती दुःख द्यावे याचा नियम मात्र प्राचार्य पी. बी सावंत सरांवेळी पुसला गेला होता कि काय असा प्रश्न पडतोय. दोन्ही मुलांच्या निधनाचा धक्का पचवून आपल्या विचारांवर ठाम राहत नियतीला देखील सरांनी शह दिला होता. बहुजनांसाठी आपली ह्यात सरांनी वेचली. आज त्यांना अखेरचा निरोप देताना त्यांच्या विचारांचा वारसा हा आपल्या सर्वांना सांभाळायचा आहे मात्र हा निरोप कंठ दाटवणारा असल्याचे आ विनायक मेटे यांनी श्रद्धांजली अर्पण करताना म्हंटले.