बीड दि.8 (प्रतिनिधी): सुप्रसिध्द र्हदयरोगतज्ञ डॉक्टर गंगाधर मुंडे यांचे सोमवार दिनांक 7 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास र्हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यसमयी त्यांचे वय 52 वर्षे होते. डॉ.गंगाधर मुंडे यांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रासह अनेकांनी तीव्र दु:ख व्यक्त केले.
नांदूरघाट रूग्णालयाच्या अधिक्षक डॉ.महानंदा मुंडे यांचे ते पती होत. मुळ परळी तालुक्यातील डाबी येथील रहिवासी असलेल्या डॉ.गंगाधर मुंडे यांनी वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. बीड शहरात नगररोडवर शासकीय विश्रामगृहाच्या बाजुला मुंडे हॉस्पिटलच्या माध्यमातून गेल्या 20 वर्षापासून ते रूग्णसेवा करीत होते.
डॉ.गंगाधर मुंडे यांची र्हदयरोगतज्ञ म्हणून मोठी ख्याती होती. सोमवारी रूग्ण तपासणी केल्यानंतर चालताना श्वसनाचा त्रास वाढल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना औरंगाबाद येथे हालविण्याचा सल्ला दिला. रस्त्यात असतांना त्यांना र्हदयविकाराचा झटका आला. औरंगाबाद येथील रूग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
शांत, संयमी आणि मितभाषी असलेल्या डॉ.गंगाधर मुंडे यांनी अनेक गोर-गरीब रूग्णांची अल्पदरात रूग्णसेवा केली. सतत कार्यमग्न आणि प्रामाणिकपणा यामुळे वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे मोठे नाव होते.
डॉ.गंगाधर मुंडे यांच्या पश्च्यात पत्नी, चार भाऊ, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.