मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलनाचे नेतृत्व करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी वाढल्या असून, मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. जरांगे पाटील यांनी २ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र, या आंदोलनासाठी कोणतीही अधिकृत परवानगी न घेतल्याचा आरोप करत त्यांच्यासह पांडुरंग तारक, गंगाधर कालकुटे, चंद्रकांत भोसले, वीरेंद्र पवार आणि प्रशांत सावंत या पाच सहकाऱ्यांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात आता पोलिसांनी जरांगे पाटील आणि इतर पाच जणांना येत्या १० नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत; ते चौकशीला उपस्थित राहतात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चेत असलेले मनोज जरांगे पाटील सध्या राजकीय वादामुळेही प्रकाशझोतात आहेत. सध्या जरांगे पाटील आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यात परस्परांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, ज्यात हत्येचा कट आणि नार्को टेस्टच्या मागणीसारख्या मुद्द्यांचा समावेश आहे.