धनगर समाजाने आत्महत्या न करता संघर्ष करावा – मीनाक्षी देवकते डोमाळे

धनगर समाजाने आत्महत्या न करता संघर्ष करावा – मीनाक्षी देवकते डोमाळे
बीड । वार्ताहर
धनगर समाज हा ऐतिहासिकदृष्ट्या लढवय्या, परिश्रमी आणि स्वाभिमानी आहे. संकटं आली तरी आत्महत्या हा पर्याय नाही. आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची गरज आहे. हीच खरी समाजाप्रती आपली जबाबदारी आणि कृतज्ञता ठरेल, असे आवाहन धनगर समाज अहिल्या महिला आघाडीच्या सचिव मिनाक्षी देवकते-डोमाळे यांनी केले आहे.
अलीकडील काळात अवघ्या एका महिन्यात तीन धनगर बांधवांनी आत्महत्या केल्याच्या घटनांनी समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर देवकते यांनी प्रसारमाध्यमांतून समाजाला उद्देशून एक पत्रक प्रसिद्ध केले. आरक्षण हा धनगर समाजाचा घटनात्मक अधिकार आहे. मात्र, समाजातीलच माणसं राहिली नाहीत, तर हा लढा कोणासाठी? त्यामुळे आत्महत्या थांबवा आणि एकवटून सरकारसमोर आपली ताकद दाखवा, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
त्यांनी पुढे सांगितले की, धनगर समाजाने इतिहासात कधीही हार मानली नाही. संकटं आली, परंतु समाजाने नेहमी त्याचा सामना केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, मल्हारराव होळकर, आणि सम्राट अशोक यांसारख्या थोर पूर्वजांचा आपल्याला वारसा आहे. त्यांचे विचार आणि धैर्य आपल्यात असताना आपणच खचून कसं चालेल?
देवकते यांनी आत्महत्या रोखण्यासाठी लवकरच एक विशेष जागृती मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे. समाजातील युवकांमध्ये सकारात्मक विचार पेरणे, मानसिक आरोग्य विषयक संवाद वाढवणे, आणि संघर्षाची ऊर्जा वाढवण्यासाठी ही मोहीम राज्यभर चालवली जाणार आहे.
समाज बांधवांनो, तुमच्या मागे तुमचा परिवार, समाज आणि इतिहास उभा आहे. तुम्हीच जर हतबल झालात, तर पुढील पिढ्यांचं काय? आत्महत्या नाही, आता संघर्ष आणि हक्क मिळेपर्यंत झगडा! असे ठाम शब्दांत देवकते यांनी सांगितले.
सरकारला हलवायचं असेल, तर समाजाने संघटित राहून सामूहिक आंदोलनाचं रूप घ्यावं, असे आवाहनही त्यांनी शेवटी केलं.

error: Content is protected !!