चकलाब्यात तिघांना मारहाण; आठ जणांवर गुन्हा


चकलाब्यात तिघांना मारहाण; आठ जणांवर गुन्हा
गेवराई (बीड), दि. १९ (प्रतिनिधी) –
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चकलांबा या गावात किरकोळ वादातून तिघांना बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध चकलांबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मारहाणीतील जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, नंतर त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले.

शनिवारी रात्री किरकोळ वाद झाल्यानंतर जावेद जब्बार सय्यद हे चकलांबा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेले होते, मात्र याठिकाणी गुन्हा दाखल करून घेतला नाही. त्यामुळे ‘तक्रार देण्यास का गेला’ याचा राग मनात धरून, रविवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास माजी पंचायत समिती सदस्य सय्यद रशीद शेख याच्यासह जावेद रशीद शेख, जैद हनीफ सय्यद, साद हशीफ सय्यद, साहिल सय्यद शेख, हनिफ राफेक सय्यद, खाजा इस्माइल शेख आणि इस्माइल रमजान शेख (सर्व रा. चकलांबा) या आठ जणांनी संगनमत करून जावेद सय्यद याच्या घरासमोर येऊन त्यांना बाहेर बोलावले व “तू रात्री पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी का गेला होता?” असा जाब विचारत आरोपींनी अचानक काठ्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी पायावर चाकूचा वार देखील केला.
याच दरम्यान भांडण सोडवण्यासाठी पुढे आलेले जावेद सय्यद यांचे वडील जब्बार शेख आणि पत्नी सुमय्या जावेद सय्यद यांनाही आरोपींनी मारहाण केली. या मारहाणीत तिघेही गंभीर जखमी झाले असून, गावात एकच खळबळ उडाली आहे. जखमींना चकलांबा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


पीडित कुटुंबाचा उपोषणाचा इशारा:
या घटनेतील जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांनी आरोपींना त्वरित अटक न केल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मारहाणीमुळे गावात सध्या तणावाचे वातावरण आहे.

error: Content is protected !!