श्री क्षेत्र भगवानगडाला ४ हेक्टर वनजमीन मंजूर; देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्याला यश


अहमदनगर: श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्ट, खरवंडी (जि. अहमदनगर) येथील भाविकांच्या सेवासुविधांसाठी, रुग्णालय, प्रशिक्षण केंद्र आणि सामाजिक विकासाकरिता आवश्यक असलेली वनविभागाची ४ हेक्टर जागा देण्यास अखेर केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. महंत नामदेवशास्त्री महाराज आणि संस्थानने केलेल्या मागणीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला आज यश आले आहे.


केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल विभागाने बुधवारी (१ ऑक्टोबर) याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली. या निर्णयाची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवजी यांचे मनापासून आभार मानले आहेत.


अधिकृत पत्रातील तपशील:


केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्रालयाच्या (वन संरक्षण विभाग) ‘दिनांक ०१/१०/२०२५’ च्या पत्रात, ‘ऑनलाईन प्रस्ताव क्र. FP/MH/OTHERS/453264/2023’ नुसार ‘श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्ट खरवंडी’ या संस्थेच्या नावे ४.०० हेक्टर वनजमीन सामाजिक विकास कार्य, वाहनतळ (Vehicle Parking), रुग्णालय (Hospital), सामाजिक प्रशिक्षण केंद्र (Social Training Centre) आणि यात्री निवास (Yatri Niwas) या बिगर-वन उपयोगासाठी (non-forestry use) ‘वन (संरक्षण) अधिनियम, १९८०’ च्या कलम २ (ii) (ii) अंतर्गत ‘अंतिम मंजुरी’ (Final Approval) देण्यात आली आहे, असे स्पष्ट नमूद आहे.


फडणवीस यांनी व्यक्त केला आनंद
उद्याच्या विजयादशमीच्या पूर्वसंध्येला ही माहिती देताना आपल्याला अतिशय आनंद होत आहे, अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. तसेच, त्यांनी श्री संत भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक होत असल्याचेही सांगितले.
हा निर्णय ऊसतोड मजुरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र भगवानगडावरील भाविकांसाठी एक मोठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. गडाच्या विकासाला यामुळे मोठी चालना मिळणार आहे.

error: Content is protected !!