सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या या मागणीला अनेक आमदार, खासदारांनी पाठिंबा दिला आहे. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली राज्य सरकारने जरांगे यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न निष्पळ ठरला. आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, आता जरांगे यांच्या या मागणीमुळे ओबीसींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून पहिल्यांदाच मंत्री छगन भुजबळ सक्रिय झाले आहेत. त्यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे.
मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनामुळे ओबीसी नेते लक्ष्मण हाके चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यभरातील ओबीसी संघटनांनी उपोषणाची तयारी केली असून, नागपुरात साखळी उपोषण सुरूही झाले आहे. जालना जिल्ह्यातही 1 सप्टेंबरपासून ओबीसी संघटना उपोषण करणार आहेत.
या सर्व घडामोडींमध्ये, मराठा आरक्षणाला विरोध करणारे ओबीसी नेते छगन भुजबळ मात्र शांत होते. परंतु, जरांगे यांचे आंदोलन तीव्र होताच, भुजबळ पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुजबळ यांनी 1 सप्टेंबर रोजी मुंबईत येऊन बैठकीत सहभागी होण्यासाठी ओबीसी नेत्यांना निरोप पाठवला आहे. या बैठकीत ओबीसी नेते काय चर्चा करणार आणि त्यांची पुढील भूमिका काय असणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या तरी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, अशीच सर्व ओबीसी नेत्यांची भूमिका आहे. त्यामुळे भुजबळांच्या नेतृत्वाखालील या बैठकीत ओबीसी नेते आंदोलनाची हाक देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.