मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. केवळ संशयाच्या आधारावर आरोपीना दोषी ठरवू शकत नाही. त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे, असं एनआयएच्या विशेष न्यायालयाकडून सांगण्यात आले. 1000 पानांहून अधिक पानांचा निकाल असल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 साली झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी (Malegaon Blast Case Verdict) न्यायालयाने आज (31 जुलै) निकाल सुनावण्यात आला.
भिक्खू चौकात 17 वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटातील (Bhikkhu Chowk bomb blast) सर्व आरोपींची आज मुंबईतील (Mumbai) विशेष एनआयए (NIA) न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या बॉम्बस्फोटात 6 निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली होती.
न्यायालयाने निकाल देताना नमूद केले की, सरकारी पक्ष बॉम्बस्फोट झाल्याचे सिद्ध करू शकला, परंतु स्फोट स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात त्यांना अपयश आले. तपासात अनेक त्रुटी होत्या, ज्यांचे वाचन न्यायालयात करण्यात आले. पंचनामा योग्य नव्हता आणि घटनास्थळावरून हाताचे ठसे घेण्यात आले नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तसेच, दुचाकीचा चेसिस नंबर कधीही सापडला नाही आणि साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Sadhvi Pragya Singh Thakur) या दुचाकीच्या मालक होत्या हे देखील स्पष्ट झाले नाही, असे न्यायालयाने म्हटले.
तपास यंत्रणांनी बैठकांसंदर्भात केलेले दावेही न्यायालयाला समाधानकारक वाटले नाहीत. सुरुवातीला लावण्यात आलेला मोक्का (MCOCA) नंतर मागे घेण्यात आल्याने त्याअंतर्गत घेतलेले सर्व जबाब निरर्थक ठरले. यूएपीएसाठी (UAPA) घेण्यात आलेली मान्यता चुकीची असल्याने यूएपीए लागू होत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. लष्करी अधिकारी कर्नल प्रसाद पुरोहित (Col. Prasad Purohit) यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी घेण्यात आलेल्या मान्यतेवरही न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कर्नल प्रसाद पुरोहित यांनी आरडीएक्स आणल्याचा कोणताही पुरावा नसल्याचेही न्यायालयाने म्हटले.
सर्व आरोपींना ‘संशयाचा फायदा’ (benefit of doubt) मिळत असल्याचे न्यायालयाने सांगितले. केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवता येत नाही, असे म्हणत न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली. निर्दोष सुटका होताच आरोपींनी न्यायालयाचे आभार मानले आणि “आज आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला,” असे म्हणत ते भावूक झाले.