नितेश राणेंना मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली?



औरंगजेबाच्या कबरीच्या वादामुळे नागपूरमध्ये सोमवारी उसळलेल्या हिंसाचाराचे राजकीय पडसाद उमटत आहेत. आक्रमक हिंदुत्त्वाचे नवे प्रतीक बनण्याचा प्रयत्न करणारे भाजप आमदार नितेश राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज दिल्याचे समोर आले आहे. 

मंगळवारी, नितेश राणे यांनी मुंबईतील विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी मुख्यमंत्र्यांनी राणेंना आगामी काही दिवस शांत राहण्याचे आदेश दिले. त्यानंतर नितेश राणे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची देखील भेट घेतली. 

मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर बाहेर पडताना, नितेश राणे त्यांच्या नेहमीच्या आक्रमक भूमिकेत दिसून आले. “मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला तंबी दिली का?” या प्रश्नावर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली, “मी मुख्यमंत्र्यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण द्यायला गेलो होतो. मुख्यमंत्री माझ्या हातात हात घेऊन हसले. तुम्ही तुमच्या बातम्या चालवा. मी त्यांच्या लाडक्या मंत्र्यांमध्ये आहे.” 

यानंतर राणेंनी नागपूर हिंसाचाराबाबत पुन्हा आक्रमक भाषा वापरत दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. “दंगलखोरांना त्यांचा ‘पाकिस्तानातील अब्बा’ आठवेल,” अशी परखड टिप्पणी त्यांनी केली. 

मुख्यमंत्र्यांनी सभागृहात नागपूर हिंसाचाराबाबत माहिती दिली. त्यांनी या दंगलीच्या पूर्वनियोजनाची चौकशी होणार असल्याचे सांगितले. “राज्यात आता पूर्वीसारखं काही घडवणं सोपं राहिलेलं नाही. पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आंदोलकांना गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असा इशाराही त्यांनी दिला. 

error: Content is protected !!