जालना, बीड आणि परभणीत अलीकडच्या काळात घडलेल्या घटनांमुळे या भागातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. त्यांनी तुकाराम मुंढे यांना मराठवाड्यात डिव्हिजनल कमिशनर म्हणून नियुक्त करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
मुंबईत मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दमानिया यांनी सांगितले की, तुकाराम मुंढे हे एक अत्यंत सक्षम अधिकारी आहेत. जालना, बीड आणि परभणीसह मराठवाड्यातील वाढत्या गुन्हेगारी प्रकरणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अशा खंबीर आणि निडर अधिकाऱ्याची आवश्यकता आहे.
त्यांनी असेही नमूद केले की, बीडमध्ये “मुंडे विरुद्ध मुंढे” अशी परिस्थिती निर्माण होणे गरजेचे आहे. राज्य सरकारने तुकाराम मुंढे यांना बीडसह मराठवाड्यात नियुक्त करून या भागातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी पाऊल उचलावे, अशी त्यांची ठाम मागणी आहे.