HSC Admit Card l बारावीच्या बोर्डाची परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आली आहे, त्यामुळे विद्यार्थी अभ्यासात मग्न आहेत. अशातच बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी – मार्चमध्ये होणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेचं हॉलतिकीट आजपासून उपलब्ध होणार आहे.
ऑनलाईन प्रवेशपत्र मिळणार
विद्यार्थ्यांना बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचं हॉलतिकीट ऑनलाईन स्वरूपात देखील मिळणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना [www.mahahsscboard.in](http://www.mahahsscboard.in) या अधिकृत वेबसाईटवर जाऊन हॉलतिकीट डाऊनलोड करावं लागणार आहे. मात्र, ऑनलाईन प्रवेशपत्र प्रिंट करून विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून सही व शिक्का घ्यावा लागणार आहे.
विद्यार्थ्यांना हॉलतिकीट डाऊनलोड करताना काही तांत्रिक अडचणी आल्यास त्यांनी माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.
HSC Admit Card l हॉलतिकीटवर सही शिक्का घेणे बंधनकारक
विद्यार्थी संबंधित महाविद्यालयातून ऑफलाईन स्वरूपात देखील हॉलतिकीट घेऊ शकतात. मात्र, त्या हॉलतिकीटवर प्राचार्य किंवा मुख्याध्यापक यांचा सही शिक्का घेणे बंधनकारक असेल. तसेच महाविद्यालयातून हॉलतिकीट घेण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली आहे.
याशिवाय, हॉलतिकीटवर काही दुरुस्त्या असल्यास उदा. नाव, आईचे नाव, जन्मतारीख अशा काही दुरुस्त्या ऑनलाईन पद्धतीने करता येतील. मात्र त्यासाठी शाळा, महाविद्यालयांनी संबंधित लिंकद्वारे दुरुस्ती शुल्क भरून दुरुस्त्या विभागीय मंडळाकडे मान्यतेसाठी पाठवाव्यात.