शहरातून विविध ठिकाणाहून नऊ मोबाईल चोरल्याची दिली कबुली
गेल्या दीड महिन्यापासून बीड शहरात नगरपालिकेच्या आशीर्वादाने पथदिवे बंद आहेत. त्यामुळे भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याच अंधाराचा फायदा घेऊन शहरातील तीन युवकांनी मोबाईल चोरण्याचा प्लॅन केला. जे लोक रस्त्यावर फोनवर बोलतात, त्यांचे मोबाईल हिसकावून घेण्याचा प्लॅन या टोळीने आखला आणि शहरातून तब्बल नऊ जणांचे मोबाईल त्यांनी चोरले.
याबाबत त्या त्या पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीच्या तक्रारी नागरिकांनी दिल्या होत्या. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करत असतानाच पीआय भारत राऊत यांना मोबाईल चोरणाऱ्या टोळीची माहिती मिळाली. त्यानुसार काल रात्री पीएसआय दुल्लत यांनी नाळवंडी नाका येथे सापळा रचून तिघा जणांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी शहरातून विविध ठिकाणाहून नऊ मोबाईल चोरल्याचे सांगितले यासाठी त्यांनी दुचाकी (क्र. एम. एच. २३ ए. झेड. ६७४३) वापरल्याची कबुली दिली.
पोलीसांनी रोहीत काळे (वय २०, रा. एकता नगर बार्शी नाका बीड), प्रवीण नाडे (वय २३, रा. नाळवंडी नाका, एकता नगर बीड) व तिसरा अल्पवयीन मुलगा (रा. एकता नगर) अशा तिघांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांनी पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलीसांच्या ताब्यात दिले. सदरील कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भगत दुल्लत, पो.हे.कॉ. सलीम शेख, नसीर, तांदळे, पो.ना. शिंदे, दुबाले, गायकवाड, सुरवसे, हराळे यांनी केली.