बीड दि.23 (प्रतिनिधी): गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशिल शिक्षक अशोक निकाळजे यांनी लिहिलेल्या करुणा काळातील शिक्षण, या दर्जेदार लेखाला साधना नियतकालीकाच्या वतीने राज्यस्तरीय दुसरा पुरस्कार मिळाला आहे. रूपये 3000/ रोख बक्षीस आणि पुस्तकांचा संच देवून निकाळजे यांना सन्मानित करण्यात आले. दरम्यान बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी अशोक निकाळजे यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून पुस्तक देवून सन्मान केला.
बुधवारी बीड येथे अशोक निकाळजे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी काळम पाटील यांनी गुणवंत शिक्षक सोनवणे यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती दिली. याप्रसंगी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, उपशिक्षणाधिकारी (प्रा.) प्रवीण काळम पाटील, उपशिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, शिरूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी शेख जमीर, अंबाजोगाई गटशिक्षणाधिकारी चंदन कुलकर्णी, समग्र शिक्षा अभियानचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी नारायण नागरे, जिल्हा समन्वयक असाराम काशीद यांची उपस्थिती होती.