बीड । प्रतिनिधी (15 ऑगस्ट 2020 )
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वात ‘कहां गये वो 20 लाख करोड’, हे मोदी सरकारला जाब विचारणारे आंदोलन राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये भाजपा कार्यालयासमोर करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र शासनाला संवैधानिक मार्गाने प्रश्न विचारणे आणि जनतेच्या भावना सरकारदरबारी मांडणे हा उद्देश होता. आश्वासनाच्या व घोषणांच्या पलीकडे देशात लोकांना काहीही न देऊ शकलेल्या वांज भाजप सरकारमधील नेत्यांना याची उत्तरे देता आली नाहीत. कारण वास्तविक पाहता याची उत्तरे फसव्या भाजपा सरकारकडे नाहीत. म्हणून शांततामय व संवैधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, ‘ aतंगडे तोडून हातात देऊ’ अशी भाषा प्रसाद लाड हे भाजपचे नेते करतात, हे अनपेक्षित नाही, कारण नथुराम गोडसेला आदर्श मानणाऱ्या भाजपाईंकडून दंगली, मारामाऱ्या, हिंसा, धर्मांध कारवाया, बेछूट व बेलगाम वक्तव्य आणि आता तर ‘तंगडे तोडण्याची भाषा’ यांशिवाय वेगळी अपेक्षा आपण करू शकत नाही. असे युवक काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाढे म्हणाले.
प्रत्येक जिल्ह्यात शांततामय व शासनाच्या नियमांचे पालन करून मोजक्याच 4 ते 5 पदाधिकाऱ्यांना घेऊन युवक काँग्रेसने ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेले 20 लाख करोड गेले कुठे ?’ हा साधा प्रश्न विचारला, पण त्याचे उत्तर त्यांच्याकडे नसल्याने बिथरलेल्या भाजप नेत्यांनी नेहमी प्रमाणे मारामारीची, अराजकतेची भाषा व जय श्रीराम चे नारे दिले. सत्यापासूनचा पळ किती दिवस काढणार ? जनता जागी झाली आहे. आम्ही फुले-शाहू-आंबेडकर-गांधी-नेहरू यांच्या विचारावर चालणारे आहोत. सरकारला त्यांच्या चुकीच्या धोरणांवर प्रश्न विचारायचा अधिकार संविधानाने आम्हाला दिलाय, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.’सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवल्यावर दडपशाहीची भाषा वापरत असाल, तर याद राखा जुल्मी ब्रिटिशांना पळवून लावून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांचे आम्ही वंशज आहोत. तुमच्या दडपशाहीला कणखर व संवैधानिक मार्गाने प्रतिउत्तर देऊ. हा देश जनतेने तुम्हाला वाट्टेल तसे खेळ करण्यासाठी आंदण दिला नाही, याद राखा. आता असा प्रतिसाद देणाऱ्यांची गय केली जाणार नाही.’ असा इशारा युवक काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाढे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नाच्या उत्तराच्या माध्यमातून भाजपा नेत्यांना दिला आहे.