बीड, 30 सप्टेंबर: सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती देत खटला घटनापीठाकडे वर्ग केला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर राज्यात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. आता पुन्हा एकदा आत्महत्येचं सत्र सुरू झालं आहे. बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी एका तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
बीड तालुक्यातील केतूरा गावात ही घटना घडली आहे. 18 वर्षाच्या विवेक राहाडे या तरुणानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे
मिळालेली माहिती अशी की, विवेक यानं नुकतीच नीट परीक्षा दिली होती. मात्र, विवेकला परीक्षेत कमी गुण मिळाले. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानं पुढच्या शिक्षणाची वाट कठीण झाल्यानं विवेकनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचल्याची माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं तर विवेकचा नंबर लागला असता, अशी भावना विवेकच्या आई-वडिलांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि.सुजित बडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.योगेश उबाळे करत आहेत.