केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे. रामदास आठवले यांनी काल कोरोनाची चाचणी केली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामदास आठवले सध्या मुंबईत आहेत. सोमवारी रामदास आठवलेंच्या उपस्थितीत अभिनेत्री पायल घोष हिने पक्ष प्रवेश केला. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर रामदास आठवलेंनी कोरोनाची चाचणी केली होती. या चाचणीचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. आता कोरोनावरील उपचारांसाठी रामदास आठवले हे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहेत. तसेच, संपर्कात आलेल्या लोकांनी सुद्धा कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन रामदास आठवलेंकडून करण्यात आले आहे.

हे वाचा : धक्कादायक : 20 पानी सुसाईट नोट लिहून निलंबित नायब तहसीलदाराच्या मुलाची आत्महत्या

आठवलेंच्या उपस्थित पायल घोषचा पक्षप्रवेश
दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करून चर्चेत आलेली अभिनेत्री पायल घोषने सोमवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) या पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईतील पक्ष कार्यालयात पायलने रिपाइंचा झेंडा हाती घेतला असून पक्षाचे संघटना वाढविण्यासाठी काम करणार असल्याचे म्हटले आहे. रामदास आठवले यांनी पक्षाच्या महिला उपाध्यक्षपदी पायल घोषची नेमणूक केली आहे.

सुनील तटकरे यांनाही कोरोनाची लागण
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. उपचारासाठी सुनील तटकरे यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुनील तटकरे यांची प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अजित पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

राज्यातील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती
राज्यातील महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, परिवहन मंत्री अनिल परब, कामगार व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, या सर्वांनी कोरोनावर मात केली आहे.

error: Content is protected !!