महाराष्ट्राच्या बदनामीबद्दल उद्धव ठाकरे बोलणार…

मुंबई: ‘पुनश्च हरिओम’ याचा अर्थ पुन्हा राजकारण असा नाही. पण अनेकांनी ते सुरू केलं आहे. महाराष्ट्राच्या बदनामीचा जो डाव आखला जातोय, त्यावर मी योग्य वेळी बोलणार आहे. बोलत नाही म्हणजे माझ्याकडं उत्तर नाही असं नाही,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगना राणावत प्रकरणावरून राजकारण करणाऱ्यांना अप्रत्यक्ष शब्दांत ठणकावलं आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज बऱ्याच दिवसांनंतर महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सरकारवर होणारे आरोप, कंगना राणावत प्रकरण व मराठा आरक्षणाला स्थगितीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर सविस्तर भाष्य केलं. मात्र, इतर राजकीय घडामोडींचा ओझरता उल्लेख केला. ‘करोना संपलाय असं वाटून काही जणांनी आपलं राजकारण सुरू केलंही असेल. तूर्त मी राजकारणावर काही बोलणार नाही. मात्र, महाराष्ट्राच्या बदनामीचा जो डाव आखला जातोय, त्याबद्दल मुख्यमंत्रीपदाचा मास्क उतरवून एकदा मी जरूर बोलणार आहे. त्यातले धोके आणि इतर गोष्टी मी आपल्यापुढं मांडणार आहे. मी बोलत नाही याचा अर्थ माझ्याकडं उत्तर नाही असा अर्थ होत नाही. पण मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसलो आहे. त्या पदाला साजेसं काम आपल्याला करावं लागतं,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘महाराष्ट्रात कुठलीही वाताहात झालेली नाही. प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्र सरकार आपलं काम करतं आहे. पूर्व विदर्भातील वादळ, निसर्ग चक्रीवादळ, मधल्या काळात एक अघोषित वादळ मुंबईत येऊन गेलं. या सगळ्या परिस्थितीत राज्य सरकार खंबीर पावलं टाकत आहे. केवळ जनतेच्या आशीर्वादामुळं व सहकार्यामुळं हे शक्य होत आहे,’ अशी कृतज्ञता मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राच्या बदनामीचं जे राजकारण सध्या खेळलं जातंय, त्याबद्दल मी मुख्यमंत्रिपदाचा मास्क बाजूला ठेवून जरूर बोलणार आहे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांना दिला.

बातम्या

लॉकडाऊन हा विषय आता संपला!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!