आईच्या निधनाचं दुःख बाजूला सारत अवघ्या 3 दिवसांत राजेश टोपे जनतेच्या सेवेत रूजू

मुंबई | आईच्या निधनाचं दु:ख बाजूला ठेवत अवघ्या तीन दिवसांतच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे कामावर रूजू झाले आहेत. आरोग्यमंत्री टोपे यांनी जालना जिल्ह्यातील अंबडमधील कोरोना सेंटरला मंगळवारी संध्याकाळीच भेट दिली. तर बुधवारी मुंबईत आल्यानंतर त्यांनी आपल्या दैनंदिन बैठका घेऊन कामाला सुरूवात केली.

आरोग्यमंत्री टोपे यांच्या मातोश्री शारदाताई यांचं 1 ऑगस्ट रोजी दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या अंत्यसंस्कारांवेळी देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या नियमावलीचं पालन करण्यात आलं. “आईने शेवटच्या काळात पाठीवर दोन्ही हात ठेवून आशीर्वाद दिला. आता ह्याच आशीर्वादाच्या बळावर पुन्हा जोमाने कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरलो असल्याची भावना आरोग्यंत्र्यांनी व्यक्त केलीये.

टोपे कुटुंबियांचं जालन्यासह राज्यभर असलेले जिव्हाळ्याचे संबंध पाहता अंत्यसंस्कारासाठी मोठी गर्दी होईल हे लक्षात घेऊन आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक, ट्विटरद्वारे अंत्यसंस्काराचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे अंत्यसंस्कारासाठी प्रत्यक्ष उपस्थित न राहता आहे. तिथूनच थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून अंत्यदर्शन घेण्याचे आणि आदरांजली अर्पण करण्याचे आवाहन त्यांनी केलं होतं.

ग्रामीण भागात आजही कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर 14 दिवसांचे सुतक पाळताना सदस्यांनी कामकाज न करता घरातच थांबण्याची प्रथा आहे. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. आताच्या काळाशी तर्कसंगत निर्णय घेताना बदलाची सुरूवात स्वत: पासून करण्याचा संदेश समाजापुढे द्यायचा होता म्हणूनच आईच्या निधनानंतर 14 दिवसांचा दुखवटा न पाळता याकाळातील विधी तीन दिवसात केलं, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!