पुण्यात मास्क न वापरल्यास होऊ शकतो एवढा दंड!

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही वाढलं आहे. मात्र तरीही नागरिक आवश्यक ती काळजी घेत नसल्याचं अजित पवार यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मास्क न वापरणाऱ्यांना 1000 रुपये दंड करण्याचा विचार असल्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. मास्क वापरण्यासाठी वारंवार सूचना दिल्यानंतर देखील लोक मास्क वापरत नाहीत आणि त्यामुळे आता दंडाची रक्कम वाढवावी लागेल असे अजित पवार (ajit pawer) यांनी म्हटलं आहे. (Pune mask fine 1000 rs)

सध्या मास्क वापरणाऱ्यांना पाचशे रुपये दंड करण्यात येतो. परंतु आता तो आणखी वाढवण्याचा विचार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे अजित पवार यांनी ही घोषणा पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी केली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते. आज अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभारलेल्या 210 व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडची क्षमता असलेल्या हॉस्पिटलचे उद्घाटन झालं.

त्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुणे महापालिकेने उभारलेल्या अशाच हॉस्पिटल्सचे देखील उद्घाटन केलं. पुणे महापालिकेने उभारलेल्या या हॉस्पिटलमध्ये 314 बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यामध्ये व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड उपलब्ध असणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये या आधीच कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी दोन जंबो हॉस्पिटल सुरू झालेत. पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात उभारण्यात आलेल्या जंबो हॉस्पिटलचे उद्घाटन रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आलं तर पिंपरी-चिंचवड महापालिकेने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत अण्णासाहेब मगर मैदानावरती उभारलेल्या दुसऱ्या जंबो हॉस्पिटलचे उद्घाटन अजित पवार यांच्याच उपस्थितीत दोन दिवसांपूर्वी पार पडलं.

मात्र तरीही पुण्यात परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट बनवलीय. कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतेय. त्यामुळे आता मास्क घालण्यावर आणखी कडक कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटलंय. त्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील कौन्सिल हॉलला एका बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीत दंडाची रक्कम वाढवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणं हे कोरोनाचा हॉटस्पॉट बनलंय. राज्यातील सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ही सध्या पुण्यात आहे. पुण्यातील एकूण रुग्णांची संख्या ही एक लाख तीस हजारांच्या पुढे गेली आहे. मुंबईलाही पुण्याने या बाबतीत मागे टाकलंय.

याआधी अनेक शहरांमध्ये मास्क न घालणाऱ्यांवर पोलिस कारवाई करत असल्याचं आणि दंड वसूल करत असल्याचं दिसून आलंय. मात्र तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आल्याचे दिसून आलेलं नाही. आता दंडाची रक्कम वाढवून एक हजार रुपये करण्याचा विचार सुरु झाल्यावर तरी लोक व्यवस्थित मास्क वापरण्याकडे वळतील आणि कोरोना रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल ही अपेक्षा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!