पेशावर: आज सकाळच्या सुमारास हा स्फोट झाला. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. मृतांमध्ये आणि जखमींमध्ये ९ ते १५ वर्षाच्या मुलांचा समावेश असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.
पाकिस्तानमधील पेशावर येथील डार कॉलनीत भीषण स्फोट झाला आहे. मदरशात झालेल्या या स्फोटात सातजण ठार झाले असून जवळपास ७० जखमी झाले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याचे समजते.
हे वाचा : नोकरदारांना उद्या खूशखबर मिळणार? ईपीएस पेन्शन ५ हजार होण्याची शक्यता
वरिष्ठ पोलीस अधीक्षक मन्सूर अमन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असल्याचे पाकिस्तानमधील ‘द डॉन’ या वृत्तपत्राने म्हटले आहे. हा स्फोट आयईडी स्फोट असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. या स्फोटासाठी जवळपास पाच किलो स्फोटकांचा वापर केला असल्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केली आहे. स्फोटाची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटना स्थळावरून पुरावे जमा करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती सकाळच्या सुमारास बॅग घेऊन मदरशात आली होती. त्या बॅगेचा स्फोट झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळावरून पुरावे जमा करण्याचे काम सुरू असून त्या व्यक्तीबाबत माहिती घेतली जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बलुचिस्तान आणि वजिरीस्तानच्या आदिवासी भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहा लष्करी जवानांसह २० सुरक्षा जवान ठार झाले होते. ग्वादर जिल्ह्यातील ओरमारा भागात पाकिस्तान जवानांच्या सुरक्षेत जाणाऱ्या तेल व गॅस उत्पादन कर्मचाऱ्यांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात १४ सुरक्षा जवान ठार झाले. हा बलुच दहशतवाद्यांनी केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर, दुसरीकडे वझिरीस्थानमध्येही पाकिस्तानी जवानांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराच्या कॅप्टनसह सहा जवान ठार झाले. तर, एकजण जखमी झाला आहे. हा हल्ला आयईडी स्फोटांद्वारे घडवण्यात आला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.