गद्दारांच्या यादीत माझं नाव नाही; राणे पिता-पुत्रांना सुनावले

अहमदनगर: ‘मी भगव्याच्या धुंदीत आहे. तुम्ही तर भगवा सोडून पळाले, काँग्रेसमध्ये गेले, नंतर भाजपमध्ये आले. मी निष्ठावंत आहे. गद्दारांच्या यादीत माझे नाव नाही. त्यामुळे आधी आपण आपली औकात व निष्ठा कुठे आहे ती ओळखावी, नंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर टीका करावी, असा घणाघात शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर केला. ते नगर मध्ये बोलत होते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून नितेश राणे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती . या टीकेला उत्तर देताना पाटील यांनी राणेंवर तोफ डागली. ‘नारायण राणे जेव्हा शिवसेनेतून होते, तेव्हा आम्ही त्यांचे पाठीराखे होतो. हे त्यांचे पोटे तेव्हा बनियनवर असतील. आता त्यांनी मला शिकवू नये . मी ३६ वर्षे शिवसेनेत असलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला धमक्या देऊ नये. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. राणे यांनी माझ्यावर टीका केली आहे की, गुलाबराव पाटील किती वेळा शुद्धीत असतात? अरे मी एका धुंदीत असतो, ते म्हणजे भगव्याच्या. मी निष्ठावंत आहे. गद्दारांच्या यादीत माझे नाव नाही, असा टोलाही पाटील यांनी यावेळी लगावला.

मी जेव्हा नितेश राणे यांच्या वडिलांच्या मागे उभा होतो. तेव्हा ते फाइटर बटालियनमध्ये माझे नाव घेत होते. आता नारायण राणेंना मी कसा काय वाईट वाटायला लागलो? असा प्रश्न उपस्थित करतानाच नैराश्यामध्ये असलेल्या माणसाला काही उद्योग नसतो, असा टोलाही त्यांनी लगावला.
सुशांतसिंह प्रकरणावरून नारायण राणे यांनी केलेल्या आरोपांचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. ‘नारायण राणे यांना ठाकरे कुटुंबियांनी मोठे केले. ज्या नारायण राणे यांचे नाव ठाकरेंनी तयार केले, त्या ठाकरे कुटुंबावर तरी राणेंनी असे घाणेरडे आरोप करायला नको होते. कारण माणूस कुठल्या विचारात गेला, यापेक्षा तो कोणामुळे मोठा झाला, हे त्यांनी पाहायला पाहिजे होते . पण ज्याला मनाची नसते , त्याला जनाची काय असणार , असेही ते म्हणाले.

भाजपला दुसरे कारण नाही!

सरकारला बदनाम करण्याचे भाजपला आता दुसरे कारण राहिले नाही. यापूर्वी ते म्हणायचे राज्याचे मुख्यमंत्री घरात बसून आहेत. पण घरात बसलेला मुख्यमंत्री हा देशाच्या पाच मध्ये येतो, हे त्यांनी लक्षात घ्यावे. कोविड नसता तर देशातील एक नंबर मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे असते. परंतु भाजपकडे कोणता मुद्दा नसल्यामुळे ते सध्या सुशांतसिंह प्रकरणावरून सरकारवर शितोंडे उडवण्याचे काम करीत आहेत. सरकारचे फक्त बदनामी करणे एवढेच चालू आहे. मात्र यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेला ते धक्का लावू शकत नाही. ज्या माणसाने मुख्यमंत्रिपद वगळता एकही खाते स्वत:कडे ठेवले नाही, जे जनतेची नि:स्वार्थपणे सेवा करत आहेत, जो माणूस जनतेच्या हृदयात आहे, हे त्या माणसाला बदनाम करू शकत नाहीत, असं पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!