लखनौ : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात छेडछाड करणाऱ्या टोळक्यापासून बचावाच्या प्रयत्नात एका विद्यार्थिनीचा अपघातात मृत्यू झाला. सुदीक्षा भाटी असं या तरुणीचं नाव असून तीन अमेरिकेतील बॅब्सन कॉलेजमध्ये शिकत होती. काही दिवसांपूर्वीच ती अमेरिकेतून भारतात परतली होती. सुदीक्षाला मागील वर्षी HCL तर्फे 3.80 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सुदीक्षा भाटी तिच्या काकांसोबत स्कूटीवरुन औरंगाबादला मामाकडे जात होती. त्यावेळी बुलेटवर असलेल्या दोघांनी तिचा पाठलाग केला. यावेळी हे टवाळखोर तिच्यावर कमेंट्सही करत होते. यादरम्यान बुलेटवर असलेल्या तरुणाने अचानक ब्रेक लावला आणि सुदीक्षाची स्कूटी बुलेटला जोरदार धडकली. या अपघातात सुदीक्षा स्कूटीवरुन पडली. गंभीर जखमी झाल्याने तिने जागीच प्राण सोडले.
पोलिसांनी अज्ञात दुचाकीचालकांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला. दरम्यान, गाझियाबादमध्ये पत्रकार विक्रम जोशी यांच्या हत्येनंतर आता सुदीक्षा भाटीचा मृत्यू या दोन्ही घटना उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्थेची ग्वाही देत आहेत.