सिंधुदुर्ग : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत असेल तर मी कुठेही जाउन आंदोलन करायला तयार आहे, पण त्यासाठी संजय राऊतांना माझी गरज का वाटावी ? ज्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून ते सरकार मध्ये आहेत. त्या काँग्रेस आमदारामुळे शिवाजी महाराज यांचा पुतळा बेळगाव मधून काढला गेला, याचा जाब आधी त्यांनी काँग्रेसला विचारावा, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातल्या लाईफटाईम हॉस्पिटलमधल्या कोविड टेस्ट लॅबच्या उद्घाटनासाठी फडणवीस सिंधुदुर्गात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
सीमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हटविला. महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद जागोजागी उमटले आहेत. औरंगाबाद, हिंगोली, नागपूरसह अनेक ठिकाणी आंदोलनं झाली. यावेळी शिवसैनिकांनी भाजप आणि कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, कायदेशीर बाबींची पूर्तता करून आठ दिवसात पुतळा बसवण्याचा बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
नारायण राणे यांनी संजय राऊताना प्रत्युत्तर दिलं
वेळ पडल्यास विरोधीपक्षाच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन करु, पण ते यायला तयार आहेत का?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊतांनी(sanjay raut) विचारला होता. याला भाजप नेते नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात खूप कामे आहेत. मी मोकळा आहे, कधी येता कर्नाटकला सांगा?, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात खूप कामे आहेत. मी मोकळा आहे, कधी येता कर्नाटकाला सांगा? असा सवाल राणेंनी विचारला. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला कलाटणी देण्यासाठी कर्नाटकमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय चालू आहे, असा दावाही नारायण राणे यांनी केला आहे.
दरम्यान, सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंतच महाराष्ट्रातील सरकार राहील, असा दावा नारायण राणेंनी केला. तसेच तीन पक्षात एकमत नसल्याने हे सरकार चालणार नाही, असं भाकित राणेंनी वर्तवलं आहे.