बीड (प्रतिनिधी):
बीड नगरपरिषदेच्या मतमोजणीत १० व्या फेरीअखेर निकालाचे चित्र
अत्यंत रोमांचक वळणावर येऊन ठेपले आहे. सुरुवातीला मोठी आघाडी घेणाऱ्या भाजपच्या उमेदवार डॉ. ज्योती घुमरे यांचे मताधिक्य आता केवळ २,५२३ वर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (घड्याळ) प्रेमलता पारवे यांनी जोरदार मुसंडी मारत भाजपला कडवे आव्हान दिले असून शहरात ‘घड्याळाचे’ मोठे कमबॅक पाहायला मिळत आहे.
नगराध्यक्ष पद: १० व्या फेरीअखेरची सद्यस्थिती
१० व्या फेरीअखेर डॉ. ज्योती घुमरे यांनी आपली आघाडी कशीबशी टिकवून ठेवली असली, तरी राष्ट्रवादीने अंतर वेगाने कमी केले आहे.
* डॉ. ज्योती घुमरे (भाजप – कमळ): २७,९११ मते
* प्रेमलता पारवे (राष्ट्रवादी – घड्याळ): २५,३८८ मते
* स्मिता वाघमारे (राष्ट्रवादी शपा – तुतारी): २०,४८५ मते
* सुरेखा शृंगारे (वंचित – पतंग): २,९२९ मते
नगरसेवक पदाचे बलाबल (२० प्रभागांमधील स्थिती)
नगरसेवक पदाच्या शर्यतीत राष्ट्रवादीने भाजपशी बरोबरी साधली आहे. एकूण ४० जागांपैकी २० प्रभागांतील कलानुसार दोन्ही प्रमुख पक्ष समसमान पातळीवर आहेत.
* भारतीय जनता पक्ष (कमळ): १४ जागा
* राष्ट्रवादी काँग्रेस (घड्याळ): १४ जागा
* राष्ट्रवादी काँग्रेस – शपा (तुतारी): ०९ जागा
* शिवसेना – शिपा (धनुष्यबाण): ०१ जागा
* शिवसेना – उबाठा (मशाल): ०१ जागा
* वंचित बहुजन आघाडी (पतंग): ०१ जागा
‘कमबॅक’ की ‘विजय’?
सहाव्या फेरीपर्यंत ८ हजारांवर असलेली डॉ. ज्योती घुमरे यांची आघाडी आता १० व्या फेरीपर्यंत अवघ्या अडीच हजारांवर आली आहे. यामुळे भाजपच्या गोटात धाकधूक वाढली असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. नगरसेवक पदाच्या संख्येतही राष्ट्रवादीने (घड्याळ) १४ जागांपर्यंत मजल मारत भाजपला बरोबरीत रोखले आहे.
आता उरलेल्या फेऱ्यांमध्ये डॉ. ज्योती घुमरे आपली आघाडी टिकवतात की प्रेमलता पारवे चमत्कार घडवतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.