नवी दिल्ली – राजस्थान काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांचे बंड शमवण्यात काँग्रेस नेतृत्वाला यश आल्याची चिन्हं आहेत. आज दुपारीच पायलट यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्याची माहिती सुत्रांकरवी मिळाली होती. अशातच आता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी संपर्क साधल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, आज पायलट-गांधी यांच्या दरम्यान झालेल्या बैठकीमध्ये पक्षांतर्गत समितीद्वारे पायलट यांच्या तक्रारींची शहानिशा करण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय झाल्याची माहिती मिळाली होती. याखेरीज राहुल यांनी, पायलट यांच्या राजस्थानबाबतीतील सर्व समस्या सोडवण्यात येतील असा शब्द दिल्याचेही सूत्रांद्वारे समजले आहे.
तत्पूर्वी, सचिन पायलट यांनी राजधानी दिल्लीमध्ये दोन आठवड्यांपूर्वी प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर सचिन पायलट यांच्यासोबत विविध स्तरांवर चर्चा सुरु होत्या. अशातच आज त्यांनी राहुल यांची भेट घेत त्यांच्याशी तब्बल दोन तास चर्चा केली. या बैठकीस प्रियंका गांधी या देखील उपस्थित होत्या.
राजस्थानातील राजकीय गुंता सोडवण्यात काँग्रेस नेतृत्वाला यश आल्याचं चित्र असून अशातच सोनिया गांधींनी गेहलोतांशी साधलेला संपर्क पायलट यांच्यासोबत समेट घडवून आणण्यासाठी टाकलेले पुढचे पाऊल असल्याचे मानले जात आहे.