पुण्यातील आयटी क्षेत्रात एका अत्यंत संवेदनशील आणि धक्कादायक घटनेने खळबळ उडवून दिली आहे. येरवडा येथील कॉमर्स झोनमधील ‘एसएलबी’ (SLB) नावाच्या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीमध्ये २१ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संतोष जी. पाटोले यांना कंपनीने कर्करोगाच्या (थायरॉईड नोड्यूल इस्थमस कॅन्सर) उपचारादरम्यान बेकायदेशीरपणे नोकरीवरून काढून टाकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कंपनीच्या या अमानवी कृतीविरुद्ध न्याय मिळवण्यासाठी पाटोले यांनी उपोषण सुरू केले आहे.
या प्रकरणाची सुरुवात एप्रिल महिन्यात झाली, जेव्हा कंपनीने आयोजित केलेल्या वार्षिक हेल्थ चेकअप कॅम्पमध्ये पाटोले यांना कर्करोगाचे निदान झाले. निदानानंतर त्यांनी ऑपरेशन आणि आवश्यक उपचारांसाठी मे आणि जून महिन्यात नियमानुसार वैद्यकीय रजा घेतली. या कालावधीत जूनपर्यंत त्यांचा वैद्यकीय खर्च कंपनीकडून दिला जात होता. मात्र, उपचार सुरू असतानाच, कंपनीने अचानक प्रकल्पामध्ये नुकसान झाल्याचे कारण देत त्यांना नोकरीतून कमी केले. गंभीर आजाराच्या काळात आणि उपचारांची नितांत गरज असताना कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे पाटोले मोठ्या संकटात सापडले आहेत.
नोकरी गमावल्यामुळे पाटोले यांचे केवळ उत्पन्नच थांबले नाही, तर त्यांना पुढील वैद्यकीय उपचारांसाठी मिळणारे कवच (Medical Coverage) देखील कंपनीने नाकारले आहे. अशा प्रकारे ऐन उपचारादरम्यान कामावरून काढणे आणि वैद्यकीय मदत थांबवणे हा अन्याय आहे, असे पाटोले यांचे म्हणणे आहे. याच अन्यायाच्या विरोधात आणि कंपनीने घेतलेला निर्णय मागे घेऊन न्याय द्यावा, या मागणीसाठी त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. संतोष पाटोले यांच्या या संघर्षाची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (विशेषतः लिंक्डइनवर) मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. अनेक आयटी कर्मचाऱ्यांनी आणि सामान्य नागरिकांनी पाटोले यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला असून, कंपनीच्या या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.