बीडमध्ये ५ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, गावकरी आणि नातलगांकडून आईवर गुन्हा न दाखल करण्यासाठी दबाव


बीडमध्ये एका साडेपाच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराची संतापजनक घटना घडली आहे. विशेष म्हणजे हा अत्याचार नात्यातीलच एका व्यक्तीने केल्याचे समोर आले आहे.
या घटनेहून अधिक धक्कादायक बाब म्हणजे, ११ नोव्हेंबर रोजी ही अत्याचाराची घटना घडल्यानंतर तब्बल चार दिवस गावकऱ्यांनी मुलीच्या आईवर गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि उपचारासाठी तिला रुग्णालयात न घेऊन जाण्यासाठी दबाव आणला होता. बदनामी नको म्हणून ग्रामस्थांनी चक्क बैठका घेतल्याचेही उघड झाले आहे.


वेदनेने असहाय्य झालेल्या चिमुरडीला घेऊन अखेर तिच्या आईने बीड गाठले आणि सध्या तिच्यावर शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची माहिती मुलीच्या नात्यातील काही व्यक्तींना मिळाल्यावर त्यांनी थेट पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर शिरूर कासार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेतला आहे.
बालकल्याण समितीचे सदस्य तत्वशील कांबळे यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली आहे. गुन्हा नोंदवण्यात झालेल्या दिरंगाईबद्दल शिरूर कासार पोलिसांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. तसेच, ९० टक्के प्रकरणांमध्ये अशा दबावामुळे पीडित कुटुंबाला पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचू दिले जात नाही, परंतु पीडितेची आई डगमगली नाही आणि तिने गुन्हा दाखल करण्यासाठी कठोर प्रयत्न केले, असेही कांबळे यांनी नमूद केले.

error: Content is protected !!