पोलीस संरक्षण काढण्याची मनोज जरांगे पाटलांची मागणी


मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे. जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर, तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी देऊन हा घातपात घडवून आणण्याचा कट होता असे उघड झाले. याप्रकरणी जालन्यात पोलिसांनी बीड जिल्ह्यातील दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र, जरांगे पाटील यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन या कटाचे सूत्रधार माजी मंत्री धनंजय मुंडे असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.


या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर, मनोज जरांगे पाटील यांनी आता आपल्या सुरक्षेसाठी दिलेले पोलीस संरक्षण नाकारले असून ते तात्काळ काढून टाकण्यात यावे, अशी मागणी त्यांनी जालन्याच्या पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्यांचे सहकारी किशोर मरकड यांच्यामार्फत त्यांनी हे पत्र सादर केले आहे. या पत्रात त्यांनी धनंजय मुंडे हेच घातपाताच्या कटाचे मुख्य सूत्रधार असल्याचा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही केला आहे. जरांगे पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल, असे म्हटले असून पोलीस अधीक्षक या प्रकरणात लक्ष घालत असल्याची माहिती दिली आहे.

error: Content is protected !!