बीड: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश भारतभूषण क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेत सातत्याने डावलले जात असल्याचा आरोप करत त्यांनी पक्षाला ‘सोडचिठ्ठी’ दिली आहे.
डॉ. क्षीरसागर यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे साहेब आणि अजित पवार गट यांना उद्देशून दि. १५/११/२०२५ रोजी राजीनामा पत्र सुपूर्द केले आहे.
राजीनाम्यामागचे कारण
डॉ. क्षीरसागर यांनी पत्रात नमूद केले आहे की, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (अजित पवार गट) बीड विधानसभा अध्यक्षपदी कार्यरत होते.
“परंतु वेळोवेळी स्थानिक पातळीवर पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये मला जाणीवपूर्वक डावलले जात असल्यामुळे मी पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाच्या कानावर ही बाब अनेक वेळा घातलेली आहे. परंतु यामध्ये कोणताही बदल झालेला दिसला नाही त्यामुळे मी माझ्या बीड विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा आपल्याकडे सुपुर्द करत आहे.”
अशा शब्दांत त्यांनी राजीनाम्याचे कारण स्पष्ट केले आहे. पक्षांतर्गत वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्देशानुसार काम करूनही स्थानिक पातळीवर डावलले जात असल्याने त्यांनी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याचे दिसते.